एकत्र या — त्यातच सर्व दलितांचे कल्याण आहे” नामदेव कांबळे यांचे अंतर्मुख आवाहन

• नागपूर | प्रतिनिधी • विद्रोही फकीरा उपसंपादक आकाश होनमाने -9850838487“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न अपूर्ण आहे — कारण आपण विखुरलो आहोत. आता वेळ आली आहे पुन्हा एकदा एकत्र येण्याची!”असा भावनिक, तरी विचारांना हादरा देणारा सूर ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चं. कांबळे यांनी छेडला आहे. नागपूर येथे झालेल्या पहिल्या लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात ते बोलत होते.कांबळे म्हणाले, “धर्मांतरानंतर नवबौद्धांना दुहेरी सवलती मिळाल्या — अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक या दोन्हींच्या. पण हा प्रश्न फक्त सवलतींचा नाही; हा प्रश्न आहे ऐक्याचा, एकात्मतेचा! आपण स्वतःपुरता विचार केला, त्यामुळे आज ‘उपवर्गीकरण’ हा नवा भिंतीचा दरवाजा उभा राहिला आहे.”त्यांनी आरक्षणाच्या इतिहासाची मांडणी करत सांगितले की, १९६१ मध्ये बी. डी. देशमुख आयोगाने अनुसूचित जातींचे चार गट केले, पण आर्थिक तरतूद मात्र घटवली. नंतर मंडल आयोगाने नवबौद्धांना आरक्षणाच्या सूचीत घेतले, तरीही सामूहिक हिताचा विचार झाला नाही. “जर आपण सर्व दलित — हिंदू असो वा नवबौद्ध — एकत्र आलो असतो, तर आज आपली राजकीय ताकद कितीतरी पटीने वाढली असती,” असा ठाम विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला. त्यांच्या भाषणात अण्णा भाऊ साठे यांचा आत्मा जिवंत झाला होता. “अण्णा भाऊंनी कधीही द्वेषाचे, वर्गाचे, धर्माचे राजकारण केले नाही. त्यांना माणूस महत्त्वाचा होता — त्याची भूक, त्याचा घाम, त्याचे माणूसपण. त्यामुळे ते फक्त दलित साहित्यिक नव्हते, तर मानवी मूल्यांचे शिल्पकार होते,” असे ते म्हणाले. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून दिली.



